दिवस आणि रात्र

केशवसुत

दिवस बोलतो, 'उठा झणी,'

रात्र 'विसावा घ्या,' म्हणते;

या दो वचनी दिन - रजनी

बहत सुचविती, मज गमते,


दिवस सांगतो, 'काम करा!'

रात्र 'विचार करा मनी,'

दिवस बोलतो 'मरा, मरा!'

रात्र 'मजमुळे जा तरूनी.'


दिवस वदतसे, “पहा प्रकाश;'

आत शिरतसे परि अंधार!

रात्र बोलते, 'पहा तमास;'

परि आत पडे प्रकाश फार!


दिवस म्हणे, 'जा घरातुनी.'

रात्र वदे, 'या सर्व घरास.'

स्पर्धा लावी दिवस जनी;

रात्र शिकविते प्रीति तयांस!


नक्षत्रे जगतीवरली

दिवस फुलवितो, असे खरे;

पुष्पे आकाशामधली

रात्र खुलविते, पाहा बरे.


एकच तारा दिन दावी,

असंख्य भास्कर परी निशा;

दिवस उघडितो ही उर्वी

रजनी अनंत आकाशा!


दिवस जनांला देव दिसे,

परि गद्यच त्याच्या वदनी;

रात्र राक्षसी भासतसे,

परि गाते सुंदर गाणी!


ही भूमी हा नरक!' असे

वदे अदय दिन वारंवार;

ही धरणी हा स्वर्ग असे!

गाते रजनी, जी प्रिय फार!


#दिवस आणि रात्र #Keshavsut  #केशवसुत  #मराठी कविता

Comments