केशवसुत |
“कोठुनि हे आले येथे?
काल संध्याकाळी नव्हते;”
हिमकण पाहनि ते वेली-
वरि पडले आज सकाळी-
आईला बाळ्या वदला
कुतुकाने उत्सुकलेला-
“दिसती हे गोजिरवाणे
मोत्यांचे जैसे दाणे!
आई ग! तर वद माते,
कोठुनि हे आले येथे?
सर्याच्या ह्या किरणांत
कसे पहा चमकतात!
मौज मला भारी वाटे!
होते हे तर वद कोठे?”
चुंबुनिया त्या तनयाते
वर करूनी बोट वदे ते-
“चंद्र आणि नक्षत्रे ती
शोभली जेथ वा राती,
उजेडही जेथुनि येतो
पाऊसही जेथुनि पडतो,
तेथुनि हे आले येथे,
तेथुनीच तू आम्हांते!”
“राहतील येथे का ते?
मिळतिल का खेळायाते?
मज गंमत वाटे आई!
घेउनि ठे मजला काही.”
“नाही रे! ते स्वकरात
येणार गडया! नाहीत;
कौतुक कर बघुनी त्यांते
असती ते जोवरि येथे;
सर्य त्यांस अपुल्या किरणी
नेईलचि लौकर गगनी,”
“जातिल ते लौकर गगनी,'
वदता गहिवरली जननी.
गतबाळे तिजला स्मरली
डोळ्यांत आसवे आली!
“देवा रे!” मग ती स्पुंदे ,
“एवढा तरी लाभू दे!”
म्हणुनि तिने त्या बालासी
धरिले हृढ निज हृदयाशी!
पाहनि त्या देखाव्याला
कळवळा कवीला आला;
वेडावुनि तयाच नादे
“खरेच!” तो पुसतो खेदे -
“होते हिमबिंदु सकाळी,
कोठे ते सायंकाळी?”
Comments
Post a Comment