केशवसुत |
त्या शूराने भगवा झेंडा हिंदुस्थानी नाचविला,
निजराष्ट्राचे वैभव नेले एकसारखे बठतीला;
जिकडेतिकडे समशेरीची कीर्ति आपुल्या गाजविली,
खूप शर्तिने कदर आपुली गनीमास त्या लावियली,
आणि तुवा रे!-त्या नीचाने पाठ आपुली दावुनिया
रणातुनी पौबारा केला शेपुट भ््याडा वळवुनिया!
गुणी जनांची पारख करूनि त्या धीराने गोरविले,
उत्साहाच्या वाते अपुल्या तेज तयांचे चेतविले;
प्रतापदीपज्योति पोषिली सुजनस्नेहा वाढवुनी;
गनीममशके कितीक गेली तिच्यामधे खाक होवोनी.
आणिक तू रे! नाचलासि तू नग्नच संगे अधमांचे,
धूळ खात गेलास, लाविले सर्वत्र दिवे शेणाचे!
भटांस, जे रणधुरंधर तया, पाचारूनि त्या सिंहाने
माराया की मरावया अरिवरि नेले आवेशाने;
“हरहर' शब्दा परिसुनि वळली कितिकांची घाबरगुंडी,
“अला मराठा!* म्हणत पळाल्या सैरावैरा किति लंडी!
तूहि भटांना पाचारियले, काय त्यांसवे परि केले?
यथेच्छ लाडू मात्र झोडिले - नाव हाय रे बुडवीले!
घोडयावरीच हरडा चोळित शत्रुशासना धावोनी!
तो गेला, - तू बिछान्यावरी राहिलास रे लोळोनी!
वीर भले खंबीर आणखी मुत्सद्दी ते सदबुध्दी
त्यांच्या साह्ये निजसत्तेची त्याने केली रे वृध्दी,
पण तू रे! तू - नगरभवान्या, नाच्चेपोऱ्ये घेवोनी
दौलतजादा केला धिक धिक भटवंशी रे जन्मोनी.
या भटवंशी महाप्रतापी ख्यात जाहले असूनिया
तुळशीमध्ये भांग निघाली अभद्र ऐशी कोठुनिया!
निजनामाचा 'गाजी' ऐसा अर्थ उरवुनी तो गेला
तर हळहळली आर्यमाउली ऐकुनि त्याच्या निधनाला.
त् गेलासी करून 'पाजी' अहह पितामह नामाला!
Comments
Post a Comment