केशवसुत |
अंतरले पाय तुझे हाय हाय माते !
मागे तव दर्शन मजलागुनी जहाले,
तदनंतर लोटुनिया दिवस फार गेले;
फिरूनि तुझ्या चरणांते
उत्सुक मी बघण्याते
असता,अंतीहि न ते
दिसले की अहह ! पूर येत लोचनाते ॥
फिरूनि तुझे कोठे ते तीर्थरूप पाहू !
पादरजी लोळूनि तव धन्य केवि होऊ !
जनकामागे जागृत
जननी गे ! तू दैवत
उरलिस, तीही साम्प्रत
गेलिस सोडुनि आम्हा दीन बालकांते ॥
कठिण जगी या बघती छिद्र काक सारे,
करूणेचे कोठेही नसे लेश वारे !
तुझ्यासवे क्षमा दया
प्रीतिही गेली विलया !
मदपराध घालुनिया
पोटी नुरल्ले कोणी प्रेम करायाते ॥
कष्ट दिले तुजला मी फार फार आई !
त्यांची मजकडुनि फेड जाहली न काही !
दुर्भग मी असा असे
म्हणुनि दुःख वाटतसे,
कठ फार दाटतसे,
रडतो गुडघ्यांत म्हणुनि घालुनी शिराते ॥
#Tuze nav mukhi #Keshavsut #केशवसुत #मराठी कविता
Comments
Post a Comment