उत्तेजनाचे दोन शब्द

केशवसुत

जोर मनगटातला पुरा

घाल, घाल खर्ची;

हाण टोमणा, चळ न जरा;

अचूक मार बर्ची!

दे टोले जोवरी असे

तस लाल लोखंड;

येइल आकारास कसे

झाल्यावर ते थंड?

उंच घाट हा चढूनिया

जाणे अवघड फार;

परि धीर मनी धरूनिया

न हो कधी बेजार!

यत्न निश्चये करूनी तू

पाउल चढते ठेव;

मग शिखराला पोचुनि तू

दिसशिल जगासि देव!

ढळू कधीही देऊ नको

हृदयाचा निर्धार,

मग भय तुजला मुळी नको

सिथ्दि खास येणार!

झटणे हे या जगण्याचे

तत्व मनी तू जाण;

म्हणून उयम सोडु नको

जोवरि देही प्राण!

 

#उत्तेजनाचे दोन शब्द #Keshavsut  #केशवसुत  #मराठी कविता 

Comments