गोष्टी घराकडिल

गोष्टी घराकडिल मी वदता गड्या रे !

केशवसुत  

झाले पहा कितिक हे विपरीत सारे -

आहे घरासाचि असे गमते मनास,

ह्या येथल्या सकळ वस्तु उगीच भास !


ही देख म्हैस पडवीमधि बांधलेली

रोमंथभाग हळु चावित बैसलेली.

मित्रा ! गजांमधुनि या पडवीचिया रे !

मौजा पहा क्षणभरी रजनीचिया रे


डोळ्यात बोट जरि घालुनि पाहशील

अंधार तो अधिकची तुजला दिसेल.

अंधार - जो फलक होत असे अम्हांस

चेतोनिबध्दजनचित्र लिहावयास !


आवाज किर्र रजनी वदतेच आहे,

धो धो' असा पवन नादहि बोलताहे;

ऐके पलीकडुनि बेइक शतभाती

पर्जन्यसूक्त सगळे मनोसक्त गाती !


ही चारपाच चढुनी हळु पायठाणे

या ओसरीवर अता जपुनीच येणे !

हे ऐक रे 'टकमका' करिते घडयाळ,

ह्या शांततेत गमते कुटितेच टाळ.


डावीस हा बघ निरखुनि एक माचा

निद्रिस्त त्यावरि पिता अति पूज्य माझा;

त्याचा खरोखर मी क्षण पुत्र शोभे,

तो सर्वद जरि म्हणे मज पुत्र लोभे !


तातास या बघुनिया हृदयात खाते,

होऊ हे हृदय विव्हळ सर्व जातें !

त्याच्या तरी पदयुगावरि या पडूनी

न्हाणू तयास मग का वद आसवांनी ?


ताताचिया बघ गडया उजवे कडेला

बापू असे तिथं बरे अमुचा निजेला;

अज्ञान तो चपलधी परि बाल आहे,

त्याचेविशी मम मनी अतिलोभ राहे !


बापू, गडया! ध्वज उभा करशील काय ?

तू देशकारण करू झटशील काय ?

बापू, जनात दिवटी धरिशील काय ?

स्वातंत्र्यदेव मनसा भजशील काय ?


मित्रा, धरी सुट्ठ हस्त मदीय फार

दारास आडसर घट्ट असेल थोर;

दाराचिया तर फटीतुन आत जाऊ

सानंद सुस्थित घरातिल सर्व गाऊ !


मित्रा, इथे कितितरी मज हर्ष होई,

येथे हवा मधुर निःश्वसनात येई,

नाही कधीहि बुधवार-वनात जैशी

वाटेवरी चतुरशिंगिचिया तैशी !


मित्रा ! असा हळच ये उजवे कडेस,

खोलली पहा पघळ ही किती ऐसपैस.

निद्रावश स्वजन येथ बघूनि यास

हर्षाचिया उकळ्या फुटती कुणास ?


ती एक खाट अवलोक समोर आता,

आहे सुपुसिवश तेथ मदीय माता;

तीचे कुशीत निजली दिसते मदीय

भीमा स्वसा, बघुनि ती मज हर्ष होय.


मत्कारणे स्तवुनि देव निजावयाते

आलीस तू खतिच गे असशील माते !

मोठे त्वदीय उपकार, जरा तरी ते

जातील का फिटुनिया तव पुत्रहस्ते ?


खाल्ली मदीय भगिनी दिसती निजेल्या,

गोष्टी जयांस कथिता पुऱ्याच झाल्या !

ती कोण दर दिसते? निजली असूनी

जी श्वास टाकित असे मधुनीमधूनी !


कांताच ही मम; अहा सखये ! मदीय

स्वप्ने अता तुज गडे दिसतात काय ?

आता असो ! पण पुठे तुजला दिसेन

स्वप्ने तुझी मग समक्ष तुला पुसेन.


मागील दारि सखया, तुळशीस आता

वन्दू, जिला मम जनी नमिला स्वमाथा !

सोडूनि गाव वळणे अमुच्या घराचे

येऊ घरा परत खासगिवालियाचे !

 


#Goshti Gharakadil  #Keshavsut  #केशवसुत  #मराठी कविता 



Comments