इतकं दिलंत,
इतकं दिलंत
इतकं दिलंत तुम्ही मला!
खरं सांगतो,
माणूस केलंत तुम्ही मला!
पावसाळ्यात तर
वर्षावाला मिती नव्हती;
माझी ओंजळ
कधीसुद्धा रिती नव्हती!
पण कधी उन्हाळ्याच्या वणव्यातही
तुमचं प्रेम सरी झाल्या,
मला शोधत घरी आल्या!
इतकं दिलंत….
तसा मी माझ्यातच गुंग होतो,
स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो,
मीच माझ्या खुशीचा रंग होतो
तरी तुम्ही मानून घेतलत,
माझं मन जानून घेतलत!
इतकं दिलंत…..
भिऊन माझ्या सावलीला
पळत होतो,
नको त्या वळणावर वळत होतो,
एकलेपणात हताश होऊन
जळत होतो….
तुम्ही मला भिजवलंत,
हिरवगार रूजवलंत !
इतकं दिलंत….
तुमचं प्रेम स्मरून इथून जाताना
तुमच्या मायेत
चिंब भिजून न्हाताना,
तुमच्या समोर
उभं राहून गाताना,
मन असं भरून येतं
डोळ्यातून झरून येतं !
डोळ्यात जेव्हा आसवं असतात
तेव्हाच माणसं माणसं असतात !
इतकं दिलंत,
इतकं दिलंत
इतकं दिलंत तुम्ही मला!
खरं सांगतो,
माणूस केलंत तुम्ही मला!– मंगेश पाडगावकर
Comments
Post a Comment