कल्पकता

केशवसुत

खा, पी, नीज, तसा उठ्नि फिरूनि ते तेच जा चिंतित,

आवर्ती जग या ठरीव अपुल्या होते हळू रांगत;

एका दुर्गम भरूशिरावरि परी देवी कुणी बैसली,

होती वस्त्र विणीत अदभुत असे ती गात गीते भली.

होते शोधक नेत्र, कर्णहि तिचे ते तीक्ष्ण भारी तसे,

होते भाल विशाल देवगुरूने पूजा करावी असे.

सूर्याची, शशिची सुरम्य किरणे घेऊनि देवी सुधी

होती गोवित इंद्रचापहि तसे, त्या दिव्य वस्त्रामधी.

मेघांच्याहि छटा, तशीच कुटिला वियुत, तसे ते ध्वनि

लाटा, पाऊस, पक्षि ते धबधबे - यांते पटी ती विणी,

तारांचे पडणे, तसे भटकणे केतुग्रहांचे, पहा,

सारे सुंदर, भव्य घेउनि तिने ते वस्त्र केले अहा!

आली भू कुतुके तिथे तिस तिने ते वस्त्र लेवीवले;

तो त्या वृध्द वसुंधरेवरि पहा! तारूण्य ओथंबले.

भूदेवी मग दृष्ट होउनि मनी, नाचावया लागली,

आता स्वर्ग मला स्वचेय वरण्या येईल,' हे बोलली.



# कल्पकता  #Keshavsut  #केशवसुत  #मराठी कविता 

Comments