केशवसुत |
हे चुम्बन निजमुखावरी माझे घे
जाता जाता हे मज बोबू दे गे -
वाटे तुज की माझे दिवस पळाले
स्वप्नापरि, ते खोटे नच गे बाले !
तथापि जर ती गेली आशा निघुनी
एका रात्रीतुनि वा दिवसामधुनी
स्वप्नामधुनी किंवा न-कशातुनिहि,
तर ती गेली कमती का गे काही?
सर्व अम्ही जे बघतो करितो वा जे
स्वप्नातिल ते स्वप्नच, सखये माझे!
कल्लोळांच्या क्षोभे गर्जत आहे
त्या सागरतीरी उभा गढे! मी आहे.
धरिले असती मी या स्वकरांमाजी
स्वर्णवालुकाकण, जे नसती राजी;
किती थोडके, परी कसे ते गळति - पहा ते पळती
माझ्या बोटांमधुनि सागरा जाती;
माझ्या नेत्रांमधुनि, आसवे चलति - आसवे गळती!
अहा ईश्वरा! घट्ट मूठ ही वळनी,
पकडाया ते शक्त मी न का म्हणुनी?
अहह! ईश्वरा! शक्ति न का राखाया
एकहि कच निर्घृण लाटेपासुनि या?
बघतो आम्ही करितो वा जे सारे
स्वप्नातिल ते स्वप्नच व्हावे का रे?# स्वप्नामध्ये स्वप्न! #Keshavsut #केशवसुत #मराठी कविता
Comments
Post a Comment